सामान्य शिवसैनिकाला संधी देण्याच्या राज्यसभा निवडणुकीतील कित्ता विधान परिषद निवडणुकीतही गिरवत नंदुरबारचे कट्टर शिवसैनिक व जिल्हाप्रमुख आमशा पडवी यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तयार राहण्याचा आदेश शिवसेनेने दिला आहे. त्याचबरोबर सचिन अहिर यांनीही पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू असे जाहीर करत आपली इच्छा प्रदर्शित केली आहे. त्यामुळे जुन्या नेत्यांना विश्रांती देऊन नव्या लोकांना संधी देण्याचा विचार शिवसेनेत सुरू असल्याचे दिसत आहे.
विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला निवडणूक होत आहे. शिवसेनेचे सुभाष देसाई व दिवाकर रावते हे दोघे निवृत्त होत आहेत. विधानसभेतील संख्याबळानुसार शिवसेनेचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. राज्यसभा निवडणुकीत कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देत सामान्य शिवसैनिकाला मोठय़ा पदावर संधी मिळू शकते असा संदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. तोच कित्ता विधान परिषद निवडणुकीत गिरवत नंदुरबारचे जिल्हाप्रमुख आमशा पडवी यांना विधान परिषदेत संधी देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.
खासदार संजय राऊत आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दूरध्वनी करून विधान परिषद निवडणुकीसाठी कागदपत्रांची तयारी करण्यास सांगितले, असे आमशा पडवी यांनी माध्यमांना सांगितले. आमशा पडवी यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व आता आदिवासी विकासमंत्री के. सी. पडवी यांना चांगली टक्कर दिली व अवघ्या १२०० मतांनी पराभूत झाले. त्यामुळे आमशा पडवी यांना ताकद देण्यासाठी शिवसेना त्यांना विधान परिषदेवर संधी देत असल्याचे दिसते. त्यामुळे दिवाकर रावते यांना विश्रांती मिळणार हे स्पष्ट होत आहे.
उद्योगमंत्री सुभाष देसाई हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार की नाही याचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरेच घेतील. सचिन अहिर यांनी शिवालय या पक्षाच्या कार्यालयात भेट देऊन नेतेमंडळींशी चर्चा केली. अहिर यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघातील विजय सुकर झाला होता. अहिर यांना आमदारकी देऊन आदित्य ठाकरे यांना आगामी निवडणूक जड जाऊ नये हे शिवसेनेचे गणित आहे.
रामराजे निंबाळकर, खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी
विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सभापती रामराजे नाईक निंबाळकर व माजी मंत्री एकनाथ खडसे यांची नावे निश्चित केली आहेत. दोघेही गुरुवारी अर्ज दाखल करणार आहेत. विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळानुसार राष्ट्रवादीचे दोन उमेदवार सहजपणे निवडून येतील. पक्षाने सभापती रामराजे नाईक िनबाळकर यांना पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांना दुसऱ्या जागेवर संधी दिली जाणार आहे. खडसे यांचे नाव विधान परिषदेवर नामनियुक्त सदस्यांच्या यादीत शिफारस करण्यात आले होते. परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गेले दीड वर्ष महाविकास आघाडी सरकारने पाठविलेल्या १२ जणांच्या नावावर काहीच निर्णय घेतलेला नाही. खडसे यांच्या नावाला राज्यपालांकडून मान्यता मिळणे कठीण मानले जाते. यामुळेच राष्ट्रवादीने खडसे यांना विधानसभा आमदारांमधून निवडून द्यायच्या जागेवर उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. सभापती निंबाळकर आणि संजय दौंड या राष्ट्रवादीच्या दोन आमदारांची मुदत संपत आहे. यापैकी दौंड यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली नाही.

No comments:
Post a Comment