गांगुलीच्या त्या ‘ट्वीट’मुळे चर्चाना आले उधाण; थेट ‘बीसीसीआय’चे सचिव शहा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसल्याचे द्यावे लागले स्पष्टीकरण

 


        नव्या वाटचालीबद्दल भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने केलेल्या ‘ट्वीट’मुळे क्रिकेटवर्तुळात चर्चाना उधाण आले; परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाचा गांगुलीने राजीनामा दिला नसल्याचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले आहे.

        गांगुलीने ‘ट्विटर’वर नव्या वाटचालीला सुरुवात करीत आहोत, असे म्हटले आहे. ‘‘१९९२ मध्ये मी क्रिकेट कारकीर्दीला प्रारंभ केला. २०२२ मध्ये या वाटचालीला ३० वर्षे पूर्ण होत आहेत. या प्रवासात क्रिकेटने मला बरेच काही दिले आहे. तुम्हा सर्वाचे पाठबळ हे सर्वात महत्त्वाचे मी मानतो. या माझ्या वाटचालीचा भाग असलेल्या, मला साहाय्य करणाऱ्या आणि माझ्या आताच्या स्थानापर्यंत पोहोचण्यास मदत करणाऱ्या प्रत्येकाचा मी ऋणी आहे,’’ असे गांगुलीने या संदेशात म्हटले आहे.

        ‘गांगुलीने ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची अफवा पसरलेली आहे. यात कोणतेही तथ्य नाही. येत्या काही दिवसांत जाहीर होणाऱ्या प्रसारण हक्काबाबतच्या प्रक्रियेकडे आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. भारतीय क्रिकेटसाठी ते महत्त्वाचे ठरणार आहे,’’ असे शाह यांनी सांगितले..

No comments:

Post a Comment