मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजू उद्धव ठाकरे यांना नीट मांडता आली नाही – रामदास आठवले

मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजू उद्धव ठाकरे यांना नीट मांडता आली नाही असं म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी विविध मुद्दावर भाष्य केले.

“महापालिका निवडणूक सोडत झाली आहे. २३ वॉर्ड अनुसूचित जातीसाठी सोडण्यात आले आहेत. महाराष्ट्रात सर्वच महापालिकांची सोडत झालेली आहे. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये भाजपा सोबत निवडणुका लढणार आहे. इतर स्थानिक स्वराज संस्थेत ही भाजपा सोबत लढणार आहेत,” असे रामदास आठवले म्हणाले.

“महाराष्ट्र सरकार जीएसटीचे पैसे मिळत नाही असे म्हणत होते. पण सगळ्या राज्यांसह महाराष्ट्राला पण परतावा दिला आहे. अजूनही महाराष्ट्र सरकार म्हणत आहे की आमचा परतावा राहिला आहे. आम्ही त्यासाठीही प्रयत्न करू.सगळ्या केंद्राच्या योजनांचे पैसे महाराष्ट्रात आले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे म्हणून महाराष्ट्रावर अन्याय होणार नाही,” असेही आठवले म्हणाले.

“महाराष्ट्र सरकारमधील शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद आहे. काँग्रेस पाठिंबा कायम ठेवायचं का नाही हे ठरवत आहे. पण काँग्रेसमध्ये ताकद असेल, तर पाठींबा काढावा. आम्ही राज्यात सरकार बनवू,” असा पुनरुच्चार रामदास आठवले यांनी केला.

“रिपब्लिकन ऐक्य होईल असे वाटत नाही. कोणाला नेतृत्व द्यायचे ते द्या मी तयार आहे. एकच पक्ष रिपब्लिकन पक्ष व्हायला हवा. अनेक वेळा ऐक्य झालं आहे पण सगळे गट एकत्र आले पाहिजेत असे समाजाला वाटते. गवई,आठवले एकत्र येतात पण आंबेडकर येत नाहीत. मात्र ऐक्यासाठी मी दोन पाऊल मागे सरायला तयार आहे,” असेही रामदास आठवले म्हणाले.

“महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षणाची बाजू उद्धव ठाकरे यांना नीट मांडता आली नाही. मराठा समाज सर्वच श्रीमंत नाहीत. या सरकारला मराठ्यांना आरक्षण देण्यास अपयश आले आहे असा माझा आरोप आहे,” असेही आठवले म्हणाले.

“संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपासोबत चर्चा करायला हवी होती. गेली सहा ते वर्षे खासदार होते. भाजपासोबत चर्चा न करता अपक्ष लढणार असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे भाजपा नाही तर शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांना धोका दिला,” असे रामदास आठवले म्हणाले.

No comments:

Post a Comment