औरंगबाद प्रभाग रचना आराखडा, तपशील फुटल्याने प्रशासकांची कोंडी

           




             

                   औरंगाबाद महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रभाग       रचनेच्या आराखड्याला अंतिम स्वरुप देण्याचे कामकाज सुरू असतानाच त्यातील गोपनीय माहिती समाजमाध्यमावरून सार्वजनिक झाली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. महापालिकेने ही फुटलेली माहिती अधिकृत नसल्याचे पत्रक काढून एका कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असला तरी यातून मनपा प्रशासनातील कामकाजावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तसेच या प्रकारातून प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांची कोंडी करण्यामागचे अदृश्य ‘बाण’ नेमके कोण याची चर्चा आता सुरू झाली आहे. शिवसेना धार्जिणे प्रशासक, असा आरोप होणाऱ्या पाण्डेय यांना अडचणीत आणले जात असल्याची शंकाही यानिमित्ताने उपस्थित केली जात आहे. 
           आस्तिककुमार पाण्डेय यांची कुशल प्रशासक म्हणून ओळख झालेली आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनीही त्यांचे कौतुक केले आहे. औरंगाबाद दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खास आस्तिककुमार यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. त्यामुळे साहजिकच प्रशासन हाताळताना घेतलेल्या कडक भूमिकेवरून पाण्डेय यांच्यावर शिवसेना धार्जिणे प्रशासक असल्याचा आराेपही अन्य पक्षातील नेत्यांकडून कायम केला गेलेला आहे. पाण्डेय यांच्या जवळपास अडीच वर्षांच्या कार्यकाळात शिवसेना नेत्यांकडूनही यापूर्वी कधीही प्रशासकांची काेंडी हाेणारे टीकात्मक वक्तव्य, आंदाेलन करण्यात आलेले नाही. अपवाद अलीकडचा शहराचा पाणीप्रश्न वगळता. त्यातही राज ठाकरे यांची सभा आणि देवेंद्र फडणवीस यांचे जलआक्रोश आंदोलनाच्या मधल्या काळात केवळ प्रशासकांची केवळ भेट घेऊन पाणीप्रश्न मांडण्यात आलेला होता. मात्र, दाेन दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेला प्रभाग रचनेचा आराखडा समाजमाध्यमावरून सार्वजनिक झाल्यानंतर खळबळ उडाली. दरम्यान प्रसारित झालेला हा आराखडा अनधिकृत असल्याचे मनपा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र या मागे शिवसेना नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचाच हात असल्याची चर्चा आहे. महापालिकेत शिवसेना पदाधिकाऱ्यांचीच अधिक उठबस असल्याने त्यांच्यापैकीच काेणीतरी अधिकाऱ्याला हाताशी धरून तयार केलेला प्रभाग रचनेचा आराखडा मिळवला आणि ताे समाजमाध्यमावरून पसरवल्याची चर्चा महानगरपालिकेच्या वर्तुळात सध्या सुरू आहे. अशी हिंमत सध्या अन्य पक्षांकडे नाही, असाही एक सूर आहे. 

No comments:

Post a Comment