दुर्मीळ अशी लहान आतडय़ाच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया ग्लोबल रुग्णालयात नुकतीच करण्यात आली. मुंबईतील अशा स्वरूपाची ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे. जे.जे. रुग्णालयात मेंदूमृत झालेल्या मध्यमवयीन महिलेच्या नातेवाईकांनी अवयवदान करण्यास संमती दिल्याने अनिर्बन सामंता यांना पुन्हा नवे जीवन मिळाले आहे.
कोलकत्याचे रहिवासी असलेल्या अनिर्बन यांना एप्रिल २०२२ मध्ये आतडय़ामध्ये सुपीरियर मेसेंटरिक आर्टरी थ्रोम्बोसिसचे निदान झाले. यामुळे गँगरीन झाल्याने लहान आतडे काढून टाकावे लागले. कोलकत्यामध्ये ही शस्त्रक्रिया झाली. यावर आतडे प्रत्यारोपण हा एकमेव उपाय असून यासाठी मुंबईलाच जाण्याचा पर्याय तेथील डॉक्टरांनी सुचविला. डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार परळच्या ग्लोबल रुग्णालयात हे कुटुंब दाखल झाले. १८ मे रोजी जे.जे. रुग्णालयातील मेंदूमृत रुग्णाच्या नातेवाईकांनी लहान आतडे दान करण्याची परवानगी दिल्याने अनिर्बन यांच्यावर लहान आतडे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया ग्लोबल रुग्णालयात यशस्वीपणे पार पडली. प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अतिशय आव्हानात्मक असल्याने जगभरात या शस्त्रक्रिया होण्याचे प्रमाण दुर्मीळ आहे.

No comments:
Post a Comment